सातारा -जिल्ह्यासह राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदारयाद्या दि. 18 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर दि.22 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. दरम्यान आरक्षण सोडत आणि आता प्रारुप मतदारयाद्यांची प्रसिध्दी जाहीर होणार असल्याने लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याचे संकेत आहेत. निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व दि. 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. प्रारुप मतदारयाद्या दि. 18 जुलै रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर 22 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदारयाद्या दि. 29 जुलै रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या दि. 8 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होतील. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांची निवडणूक लवकरच होणार आहे.