सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणार सुनावणी
नवी दिल्ली : देशात करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम-केअर निधी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. हा निधी उभारण्याच्या केंद्राचा निर्णय रद्द करावा, अशी विनंती जनहित याचिकेत करण्यात आली आहे.
या जनहित याचिकेवर सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. एल नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती एम. एम. शांतानगौदर यांच्या खंडपीठसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार आहे. ही याचिका ऍड. एम.एल. शर्मा यांनी दाखल केली आहे. जनहित याचिकेत म्हटले आहे की, 28 मार्च रोजी पीएम-केअर फंडसंदर्भा जेव्हा पत्र जारी केले गेले होते, तेव्हाच त्याविरोधात याचिका दाखल करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
या याचिकेत पंतप्रधानांसह फंडाच्या सर्व विश्वस्तांना पक्षकार करण्यात आले आहे. तसेच जमा झालेला निधी भारताच्या संचित राशीत जमा करावा. या व्यतिरिक्त न्यायालयाच्या देखरेखीखाली निधी स्थापनेसाठी एसआयटीची चौकशी केली जावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्राने 28 मार्च रोजी हा निधी स्थापन केला आहे. सध्याचा करोना व्हायरस संकटासारख्या कोणत्याही आपत्कालीन समस्येचा सामना करणे आणि पीडित लोकांना दिलासा देणे हा त्याचा हेतू आहे. या फंडाचे पंतप्रधान प्रभारी अध्यक्ष, तर संरक्षण, गृह आणि वित्त मंत्री हे त्याचे विश्वस्त आहेत.