Shirur News : स्मार्ट सोलार योजनेसाठी जनजागृती शिबिर; 900 अर्ज, 150 ते 200 ग्राहकांचा सहभाग
Shirur News : शिबिरात ग्राहकांच्या विविध शंकांचे निरसन करून स्मार्ट सोलार योजनेचा तसेच महावितरणच्या इतर ग्राहकाभिमुख योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

शिरूर : महावितरणच्या स्मार्ट सोलार योजना तसेच विविध ग्राहकाभिमुख योजनांची माहिती देण्यासाठी शिरूर उपविभागीय कार्यालयात गुरुवारी (दि. २०) विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिरूर तालुक्यातून स्मार्ट सोलार योजनेसाठी जवळपास ९०० अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जदारांना पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित शिबिरास सुमारे १५० ते २०० ग्राहकांनी उपस्थिती लावली, अशी माहिती शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद माने यांनी दिली.
महावितरणच्या स्मार्ट सोलार योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या ग्राहकांना योजनेची पुढील प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच महावितरणच्या विविध सेवांची माहिती शिबिरात देण्यात आली. याशिवाय स्मार्ट मीटर, वीज बचत, ग्राहकाभिमुख विविध योजना आणि महावितरणच्या ऑनलाइन सेवांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरासाठी येताना ग्राहकांनी आधार कार्ड, बँक पासबुक आणि आधारशी जोडलेला ओटीपी प्राप्त होणारा मोबाईल क्रमांक सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. उपस्थित ग्राहकांचे आधार अपडेशनही यावेळी करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना योजनेच्या पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यास मदत झाली.
शिबिरात ग्राहकांच्या विविध शंकांचे निरसन करून स्मार्ट सोलार योजनेचा तसेच महावितरणच्या इतर ग्राहकाभिमुख योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. यावेळी शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद माने, सहाय्यक अभियंता गणेश गोरे, संदेश पगारिया, कनिष्ठ अभियंता स्वप्नाली थोरात यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उरलेल्या ग्राहकांनीही कार्यालयाशी संपर्क करावा.
शिरूर तालुक्यातून स्मार्ट सोलार योजनेसाठी जवळपास ९०० अर्ज प्राप्त झाल्याने या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. अर्ज केलेल्या ग्राहकांना पुढील प्रक्रिया समजावून देण्यासाठी आयोजित शिबिरासही मोठी उपस्थिती लाभल्याने महावितरणच्या जनजागृती उपक्रमाला प्रतिसाद मिळाला.





