पुणे – राज्यभरातील शेतीपंपाच्या ग्राहकांकडे महावितरणची 24 हजार कोटी रुपयांची थकबाकी अडकली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे प्रशासनाचा आर्थिक डोलारा अधिकच कोसळत चालला आहे. त्याची गंभीर दखल महावितरण प्रशासनाने घेतली असून या शेतीपंपांच्या ग्राहकांची जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या मोहिमेची जबाबदारी मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. त्यासाठी खास पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यानुसार हे पथक थेट शेतावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांना वीज बील भरण्याच्या संदर्भात आग्रह करणार आहेत. या मोहिमेत बहुतांशी प्रमाणात यश येइल, असा दावा महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी केला.