पेशावरहून ‘पीटीआय’ची तुफानी आगेकूच! इम्रान खान यांच्या पक्षाचा सिनेटवर कब्जा, विरोधकांना धक्का

पेशावर – पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातून सिनेटमध्ये निवडून जाणाऱ्या ६ जागांवर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाने विजय मिळवला आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यांच्या या निवडणुकीत विरोधकांना ५ जागा मिळाल्या. खैबर पख्तुनख्वाच्या १४५ सदस्यांच्या विधीमंडळामध्ये सिनेटच्या ११ जागांसाठी ही निवडणूक झाली होती.
सर्वसाधारण श्रेणीतल्या ७ जागांपैकी पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाने ४ जागांवर विजय मिळवला. पीटीआयचे मुराद सईद, फैजल जावेद, मिर्झा आफ्रिदी आणि नूरुल हक कादरी यांना सर्वसाधारण श्रेणीतल्या जागांवर विजय मिळाला असल्याचे प्रांतीय निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. विरोधकांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज गटाचे नियाझ अहमद, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे तलहा महमूद आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम पक्षाचे अत्ता-उल-हक यांनी उर्वरित ३ जागांवर विजय मिळवला.
पीटीआयच्या रुबिना नाझ आणि पीपीपीच्या रुबिना खलिद यांनी महिलांसाठी राखीव दोन जागांवर विजय मिळवला. तर तंत्रज्ञांसाठीच्या जागेवर पीटीआयचे आझम स्वाती आणि जेयूआयचे दिलावल खान यांना विजय मिळाला.





