सातारा -डोंगराळ व दुर्गम बामणोली भागात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी तेथे आरोग्य सुविधा प्राधान्याने द्याव्यात. जिल्हा आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत.
जावळी तालुक्यातील दुर्गम अशा बामणोली भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, ग्रामस्थांना आरोग्य सुविधा तातडीने मिळाव्यात यासाठी आ. शिवेंद्रराजे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांची भेट घेतली. जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना रांजणे, माजी सदस्य राजू भोसले, ज्ञानदेव रांजणे, फिरोज पठाण, डॉ. ज्ञानेश्वर मोरे, जावळी बाजार समितीचे संचालक शिवाजी गोरे, राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे अध्यक्ष सागर धनावडे आदी उपस्थित होते.
बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चांगला असून या केंद्रासाठी 102 क्रमांकाची रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करावी. आपटी आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करावे. जावळी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रामधील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या. त्यावर, कायमस्वरूपी रुग्णवाहिका मिळेपर्यंत भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ. आपटी आरोग्य उपकेंद्र उद्यापासून आठवड्यातून एक दिवस सुरू करण्यात येईल. आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदे भरण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करू, असे आश्वासन डॉ. आठल्ये यांनी दिले.