प्रभात वृत्तससेवा तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 डीच्या प्रस्तावित रुंदीकरण कामाबाबत ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गावातून थेट महामार्ग नेण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला असून काम तात्काळ थांबवून गावाबाहेर सुरक्षित पर्यायी मार्ग निश्चित करण्याची मागणी सर्वानुमते मांडण्यात आली. बैठकीत ग्रामस्थांनी स्पष्ट केले की प्रस्तावित मार्ग शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालय तसेच दाट वस्ती या अत्यंत संवेदनशील भागांतून जात आहे. सोमवारी भरवल्या जाणाऱ्या आठवडी बाजारात सोळा गावांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर तळेगावात येत असल्याने मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत महामार्ग वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढेल, वाहतूक कोंडी निर्माण होईल, पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महिला व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येईल म्हणून प्रस्तावित मार्ग हा गावकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्याचे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. पर्यायी मार्ग हा एकमेव उपाय असल्याचा ठाम पवित्रा त्यांनी या बैठकीत दाखविला. ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले की स्थानिक प्रशासनाने शासन व पीडब्ल्यूडी विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला असला तरी त्याची योग्य त्या पद्धतीने कार्यवाही झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून त्या पत्रव्यवहारावर तातडीने निर्णय घेऊन गावासाठी सोयीस्कर पर्याय निश्चित करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली. या बैठकीस सरपंच रोहिणी तोडकर, उपसरपंच गोविंद ढमढेरे, माजी उपसभापती अनिल भुजबळ, विश्वास ढमढेरे, शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रकांत भुजबळ, आरपीआय तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ढमढेरे, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, माजी उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण ढमढेरे,यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. अधिकाऱ्यांचे आश्वासन या चर्चेसाठी उपस्थित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग (PWD) शाखा अभियंता ऋषिकेश हजारे व इतर अधिकारी यांनी ग्रामपंचायतीकडून आलेल्या सर्व पत्रव्यवहाराची नोंद घेतली आहे. त्यावर विभागाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल लवकरच ग्रामपंचायतीस देण्यात येईल. सुरक्षा, वाहतूक, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.