अभिमानास्पद! नांदेडच्या चौदा वर्षाच्या कन्येची गगनभरारी; अमेरिकेत उडविले विमान

नांदेड : नांदेडच्या कोंढा गावच्या कन्येने थेट  गगनभरारी घेतली आहे. अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने अमेरिकेत चक्क विमान उडवण्याचा पराक्रम केला आहे.  तिच्या या कामगिरीने संपूर्ण गावकऱ्यांना तिचा  अभिमान वाटत आहे.

कोंढा येथील रहिवासी असलेले केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड हे 20 वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी दोरीवर विमान उडवून दाखविणे या विषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. याचा परिणाम त्यांची मुलगी रेवा दिलीप जोगदंड यांच्या बालमनावर झाला. तेव्हापासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरू केली आणि वयाच्या 14व्या वर्षी तीचं हे स्वप्न सत्यात उतरले.

रेवाच्या या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला.

अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे गाव अतिशय लहान असून येथील व्यवसाय हा शेती आहे. तरीही शेती व्यवसायातून येथील काही सुज्ञ कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. त्याचबरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग केले जातात. तर येथील काही नागरिकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करून नवनवीन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी राम कदम या प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलीकॉप्टर मधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. या शाही विवाह सोहळ्याची प्रसार माध्यमांतून मोठी प्रसिद्धी झाली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते.

तर आता दिलीप जोगदंड यांची कन्या रेवा दिलीप जोगदंड हिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत पायलट पदासाठी लागणाऱ्या संपूर्ण चाचण्या पार करून दि. 20 जून 2021 रोजी विमानाची यशस्वी भरारी घेऊन आकाशाला गवसणी घातली. या

अभिमानास्पद कामगिरीसाठी तिचे वडील दिलीप जोगदंड, आई वंदना दिलिप जोगदंड यांनी तीला सतत प्रोत्साहन दिले आहे. या यशाबद्दल तिचे अर्धापूर तालुक्यातील सुज्ञ नागरिक, कोंढा येथील गावकरी व जोगदंड परिवाराकडून कौतुक केले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.