सरन्यायाधीशांवर आरोप करणाऱ्या महिलेकडून चौकशी समिती अहवालाच्या प्रतीची मागणी
नवी दिल्ली – सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधातील लैंगिक शोषण प्रकरण हाताळण्यासाठी वापरण्यात आलेल्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. ती करणाऱ्या 55 निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या निदर्शकांमध्ये 3 पुरूष वगळता सर्व महिला वकील आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
सरन्यायाधीशांवर करण्यात आलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली होती. त्या चौकशी समितीने सोमवारी सरन्यायाधीशांना क्लीन चिट दिली. त्यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निदर्शनांवेळी काही फलक झळकावण्यात आले. पोलिसांनी तातडीने निदर्शकांना ताब्यात घेतले. दरम्यान, सरन्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील माजी कर्मचारी महिलेने चौकशी समितीच्या अहवालाची प्रत मिळावी, अशी मागणी केली आहे. चौकशी समितीच्या कामकाजात पारदर्शकता नव्हती, असा आरोपही त्या महिलेने केला आहे.