Nevasa : भीमाशंकर-कर्जत पट्यातील बेकायदा वृक्षतोडीविरोधात नेवाशात मोर्चा
Nevasa : सरकार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून भविष्यात पर्यावरणाचा समतोल बिघडून याचा मोठा तोटा निर्माण होणार असल्याचा आरोपही यावेळी पर्यावरण प्रेमींनी बोलतांना स्पष्ट केला.

नेवासे : भीमाशंकर व कर्जत पट्यात टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पांतर्गत सुरू असलेली बेसुमार आणि बेकायदेशीर वृक्षतोड त्वरित थांबवून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी नेवासे तालुका वृक्ष व पर्यावरण संघटनेने आक्रमक भूमिका घेत शहरातील श्री खोलेश्वर गणपती मंदिरापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले.
हजारो जीव बेघर, लाखो झाडांवर कुऱ्हाड!
याप्रसंगी महेश मापारी, ॲड.संजय सुखधान, अमृत फिरोदिया, अनिल ताके, ॲड. सादिक शिलेदार, बालेंद्र पोतदार यांनी आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या. यावेळी विविध मान्यवरांनी “या बेसुमार वृक्षतोडीमुळे हजारो पशु-पक्षी बेघर होणार असून राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना केवळ एका कंपनीच्या प्रकल्पासाठी लाखो झाडे तोडून पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण केला जात आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी या प्रश्नावर ठोस भूमिका घेतलेली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जनआंदोलन अधिक तीव्र करणार आहोत,” असा संतप्त इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
आजवर मोठ्या प्रकल्पांसाठी लाखो झाडे तोडली गेली. मात्र पुन्हा वृक्ष लागवड झालीच नाही. सरकार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून भविष्यात पर्यावरणाचा समतोल बिघडून याचा मोठा तोटा निर्माण होणार असल्याचा आरोपही यावेळी पर्यावरण प्रेमींनी बोलतांना स्पष्ट केला.
टोरंट पॉवर प्रकल्पासाठी वनविभागाकडून ६०० एकर जागा देण्यात आली असून आतापर्यंत हजारो वृक्षांची कत्तल सुरु झाली आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत आणखी अडीच लाख वृक्ष तोडले जाणार असल्याची माहिती समोर आली असल्याचे आंदोलकांनी सांगून यामुळे पक्षी,वन्यजीव,कीटकांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार असल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे.
स्थानिक ग्रामस्थांना,आदिवासी बांधवांना विश्वासात न घेता प्रकल्प राबविला जात असून,”एका खाजगी कंपनीसाठी सरकार इतके मेहेरबान का?” असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. या अंदाधुंद तोडीमुळे स्थानिक जलस्रोत, वृक्षसंपदा नष्ट होऊन आदिवासी बांधव देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. ही वृक्षतोड तात्काळ न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी राजेंद्र काळे, संदीप आलवणे, रामभाऊ केंदळे, दिपक धनगे, दादा देशमुख,ॲड. पांडुरंग औताडे, ॲड.सोमनाथ वाकचौरे,संदीप बेळे,जयवंत मोटे, करीम सय्यद, जालिंदर गवळी, रंजन जाधव, इम्रान दारुवाला आदी पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





