Pune : बांधकाम कामगारांच्या गंभीर समस्यांबाबत आज दि. २४ सप्टेंबर रोजी ’श्रमिक हक्क आंदोलन’ या कामगार संघटनेतर्फे ’अप्पर कामगार आयुक्त कार्यालय, पुणे’ इथे आंदोलन करण्यात आले. कामगारांची त्यांच्याच हक्काच्या योजनांसाठी हेलपाटे घालावे लागत असून याबाबत हे आंदोलन करण्यात आले. गेले तीन महिने नोंदणीचे पोर्टल सातत्याने बंद असल्याने त्यासंबंधीची कामे अडून राहतात. तसेच अर्जात काही अडचणी असतील तर Clarification साठीची ऑनलाईन प्रक्रिया बदलल्याने कामगारांना कोणतीही संधी न मिळता अर्ज थेट नाकारले जातात. परिणामी एक साधा अर्ज मंजुर करुन घेण्यासाठी कामगारांना सुट्टी काढून अनेकदा हेलपाटे घालावे लागतात. यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या त्यांच्याच हक्काच्या योजनांसाठी केली जाणारी ही क्रुर व अमानुष थट्टा असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. हे तातडीने रोखण्यासाठी बांधकाम कामगारांनी आज आंदोलन केले. याला येरवडा, वारजे, कोथरुड व इतर भागातील शेकडो कामगार उपस्थित होते. आंदोलकांना सहाय्यक कामगार आयुक्त पवार भेटायला आले. त्यांनी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात ठोस उपाययोजना असणारी नवी सुधारित कार्य प्रक्रिया तयार करून त्याबाबत पुढील 15 दिवसात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. तसेच प्रलंबित प्रकरणांची चौकशी करून त्याबाबत कारवाई केली जाईल असेही सांगितले. यावेळी श्रमिक हक्क आंदोलनाचे सरचिटणीस सागर सविता धनराज यांनी “महिनाभरात नवी प्रक्रिया लागू न केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल” असा इशारा दिला. बांधकाम मजुर सभेचे अझिम नदाफ यांनीही महामंडाळाने तातडीने प्रलंबित मागण्यांची दखल घेण्याची मागणी केली. श्रमिक हक्क आंदोलनचे अध्यक्ष बी. युवराज, उपाध्यक्ष जगदीश राठोड, तसेच विनेश मेवाडे, प्रतिभा राठोड, बालाजी झुकझुके, आनंद हादीमणी इ. समिती सदस्य उपलब्ध होते. अनेक महिला बांधकाम कामगारही आवर्जुन उपस्थित होत्या.