Bachchu Kadu | प्रहार संघटनचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. याआधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आणि आंदोलक नेते यांच्याशी चर्चा झाली. यात आंदोलन मागे न घेता ३० ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईत चर्चा होणार आहे. याकरिता थोडयाच वेळात बच्चू कडू मुंबईकडे रवाना होणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास ३१ ऑक्टोबरला ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला. राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी आणि महसूलमंत्र्यांशी आंदोलकांची फोनवरून चर्चा घडवून आणली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना आज चर्चेसाठी मुंबईत बोलावलं असून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडून ‘आम्ही चर्चेसाठी मुंबईला गेलो तरी नागपुरातील आंदोलन दडपलं जाणार नाही’ असा शब्द घेतला. पंकज भोयर यांनी शांततामय मार्गाने आंदोलन केल्यास आंदोलकांना त्रास दिला जाणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. 31 तारखेला रेल्वेच्या रुळावर जाऊन बसू सरकारच्या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी आंदोलकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘आपली एक मागणी नाही, तर 25 मागण्या आहेत. त्यासाठी मुंबईला जाणं गरजेचं आहे. चर्चेतून प्रश्न सुटतात. आपण चर्चेला गेलो म्हणजे आपले आंदोलन संपलं असं नाही. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही, तर सुरू असलेले हे आंदोलन अधिक आक्रमक करू. 31 तारखेला रेल्वेच्या रुळावर जाऊन बसू’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. Bachchu Kadu | महामार्गावर टायर जाळत सरकारचा निषेध दरम्यान ,’महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’मुळे नागपूर-हैदराबाद व नागपूर-जबलपूर महामार्गांवरील वाहतूक बुधवारी सायंकाळपासून पूर्णपणे थांबली होती. नागरिकांना शहरात येण्यासाठी पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला. या आंदोलनामुळे नागपूरकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अशातच आंदोलक स्वतःला अटक करून घेण्यासाठी पुढे सरसावल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची आणि चर्चेतून मार्ग काढण्याची विनंती केली. Bachchu Kadu | बुधवारी सकाळी काही आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले आणि रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता परंतु, लोकांना त्रास होत असल्याने न्यायालयाने स्वत:हून दखल घेत सायंकाळी ६ वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली, पण आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना परत जावे लागले. हेही वाचा: “भ्रष्टाचार, घोटाळ्यांचे रेकॉर्ड मोडणारे कायद्याचे राज्य कसे आणणार?” ; पंतप्रधान मोदींची राजदवर सडकून टीका