प्रभात वृत्तसेवा पुणे – सामाजिक न्यायविभागाने शासकीय वस्तीगृहांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्वतंत्र आरक्षण रद्द करून समांतर आरक्षण लागू केले आहे. या निर्णयाविरोधात दिव्यांग विद्यार्थ्यांनी विश्रांतवाडीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तासमोर आंदोलन केले. या निर्णयामुळे सरकार शासकीय वसतीगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश डावलला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.केंद्राच्या दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्यानुसार प्रत्येक शासकीय शाळा, वसतीगृहामध्ये दिव्यांगांना ५ टक्के आरक्षण आहे. राज्य सरकारने वसतीगृहातील दिव्यांग आरक्षण रद्द करून समांतर आरक्षण लागू केले आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. समांतर आरक्षण रद्द करून ५ टक्के स्वतंत्र आरक्षण लागू करावे, अपंग हक्क कायद्याची पुर्ण अंमलबजावणी करावी आणि वसतीगृहात दिव्यांग विद्यार्थ्याना प्रवेश देऊन सोईसुविधांसह भेदभावमुक्त वातावरण निर्माण करावे, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. आता १ सप्टेंबरपर्यंत शासन निर्णयात बदल केला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.