ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या मजल्यावर रेडा आणून आंदोलन

कराड – वडगाव हवेली (ता. कराड) ग्रामपंचायतीत सोमवारी दि. 7 रोजी एकाने चक्क ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या मजल्यावर रेडा आणून अनोखे आंदोलन केले.
रेडा बांधायच्या जागेत ड्रेनेजेचे पाणी तुंबून त्याचा त्रास रेड्याला होत होता. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही काम न झाल्याने शेतकऱ्याने संतापाच्या भरात ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या मजल्यावर रेडा आणून आंदोलन केले. याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव हवेलीतील शेतकऱ्याची गावात रस्त्याच्या कडेला रेडा बांधण्याची जागा आहे.
याठिकाणी रस्त्याकडेला ड्रेनेजची पाइपलाइन आहे. ही पाइपलाइन तुंबल्याने पाणी पुढे न जाता या शेतकऱ्याच्या जागेत येऊन या पाण्यामुळे या ठिकाणी दलदल निर्माण झाली होती. याबाबत संबंधित शेतकऱ्याने ग्रामपंचायतीकडे तक्रारही केली होती. मात्र, काम न झाल्याने शेतकरी वैतागून गेला. त्यामुळे सोमवारी दि. 7 रोजी सकाळी रेडा चक्क ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचला. शेतकरी रेड्याला घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर जिना चढवत घेऊन गेला. तसेच तेथे काही वेळ ठाण मांडत काम झाल्याशिवाय रेडा नेणार नाही, असा पवित्राही शेतकऱ्याने घेतला होता. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली.
त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घेत शेतकऱ्याचे काम तातडीने सुरू केले.
तोपर्यंत या घटनेचा व्हिडिओ व फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. या प्रकारची चांगलीच चर्चा वडगाव गावासह परिसरात व तालुक्यात रंगली आहे.





