गिरणी कामगारांच्या घरासाठी आझाद मैदानावर मोर्चा; उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

Mill Workers Morcha | मुंबईसह महाराष्ट्रातील 14 कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आज सकाळी 11 वाजता आझाद मैदानात जाहीर सभा होणार आहे. या मोर्च्याला शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारकडून चाललेल्या फसवणुकी विरुद्ध आवाज उठवला जाणार आहे.
गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची तातडीची बैठक काल मिल मजदूर मंझीलमध्ये पार पडली. आझाद मैदानावरील ही सभा भव्य करण्याचा निर्धार कामगार नेत्यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीत अनेक कामगार कार्यकर्त्यांनी सरकारकडून जोपर्यंत आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन छेडण्याचाही मनोदय व्यक्त करण्यात आला. तसेच सरकारने याची दखल घेतली नाही तर, १४ कामगार संघटना आणि गिरणी कामगार संयुक्त कृती लढा समितीने आंदोलनाचे पुढील पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेसाठी म्हाडाकडे पावणे दोन लाख गिरणी कामगार आणि वारसांचे अर्ज दाखल झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात २५ हजार कामगारांनाच मुंबईतील घरांच्या योजनेत सामावून घेणे सरकारला शक्य झाले आहे. दीड लाख गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबईत जागा नसल्याने राज्य सरकारने मुंबईबाहेर मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) घरे देण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र सरसकट गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याची मागणी राष्ट्राय मिल मजदूर संघासह १४ संघटनेचा समावेश असलेल्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने केली आहे. तसेच विरोधानंतरही गिरणी कामगारांकडून संमतीपत्र, अर्ज सादर करून घेतले जात असल्याने गिरणी कामगार आक्रमक झाले आहेत. Mill Workers Morcha |
दरम्यान, आझाद मैदानवरील सभेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेनेचे उपनेते आमदार अनिल परब आदी मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय यानिमित्त ठाकरे बंधु पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
हेही वाचा:





