प्रभात वृत्तसेवा पुणे – संविधान का बदलावे? या पुस्तकाच्या प्रकाशनाला पोलिसांनी निर्बंध केला असतानाही त्याचे प्रकाशन बिनदिक्कत पार पडले. आयोजकांवर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, असा आरोप करीत या कृतीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरूवारी आंदोलन केले. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यकर्त्यांनी संविधान विरोधी प्रवृत्तींचा निषेध व्यक्त करीत, अशा प्रकारचे पुस्तक प्रकाशित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. देशात गेल्या ११ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित सरकार असल्यामुळे संविधान बदल या त्यांच्या ध्येलाला गती प्राप्त होत आहे. सरकारचे हे अभय असल्यामुळेच काही दिवसांपूर्वी पुणे शहरात संविधान का बदलावे? या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या प्रकाशनाला केवळ दिखाव्यासाठी पुणे पोलिसांनी निर्बंध केला. मात्र, तरीही हा प्रकाशन सोहळा बिनदिक्कतपणे पार पडला, हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.संविधान विरोधी पुस्तक प्रकाशनाचा निषेध व्यक्त करीत महायुती सरकारने अशा प्रवृत्तींना आळा घालावा, अशी मागणी जगताप यांनी केली. आंदोलनावेळी संविधानाच्या प्रतींचे नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.