पुणे : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष यांनी कोरेगाव पार्क येथील हेवन हॉटेलवर मोठी कारवाई करत वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका विदेशी महिला आणि दोन परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार तुषार मिवरकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. राहुल मदन उर्फ राहुल सन्याशी हा विदेशी व परराज्यातील मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून सापळा रचण्यात आला. हेवन हॉटेलवर छापा टाकण्यात आला असता आरोपी आदित्य अनिलकुमार सिंह ( ३१ वर्षे, रा. जर्मन बेकरी जवळ, कोरेगाव पार्क) हा महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे आढळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. तर एजंट म्हणून काम करणाऱ्या राहुल मदन उर्फ राहुल सन्याशी याचीही गुन्ह्यात भूमिका असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक आयुक्त (गुन्हे ३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, हवालदार दत्ताराम जाधव, बबनराव केदार, तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, इम्रान नदाफ , अमेय रसाळ, वैशाली खेडेकर, रेश्मा कंक, वैशाली इंगळे, अंमलदार भुजबळ यांच्या पथकाने केली.