प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; आता मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा, छुप्या प्रचारावर राहणार नजर

Maharashtra Assembly Election 2024 | मागील महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आणि दिग्गज नेते मंडळींच्या प्रचार सभांनी जोर धरला होता. प्रचार सभा आणि रोड शो यांनी राज्यातील निवडणूकीचे वातावरण ढवळून निघाले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी बुधवारी राज्यभरातील २८८ जागांवर मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तास म्हणजेच आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार करण्याची उमेदवारांना संधी असेल.
प्रचार सभांचा शेवटचा दिवस
विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने केली. यात २२ ते २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती, तर ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आपल्या पक्षातील उमेदवारांसाठी राज्यातील पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह भाजप आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि इतर राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रीही राज्यात प्रचाराला आले होते. आज या प्रचार सभांचा शेवटचा दिवस आहे.
उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन
प्रचाराच्या तोफा शांत होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. त्याआधी दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका लावला आहे. अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सभांकडे लक्ष असेल. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून, सायंकाळी पाचनंतर प्रचार संपणार असल्याने उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेल्यानंतर राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय द टेलिव्हिजन , केबल नेटवर्क ,रेडिओ, सोशल मीडिया यावर शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या तसेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास मनाई असेल.
छुप्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे लक्ष
प्रचाराच्या थोफा थंडावल्यानंतर संशयित हालचालींवर म्हणजेच छुप्या प्रचारावर प्रशासनाचे, निवडणूक आयोगाचे आणि भरारी पथकांचे लक्ष राहणार आहे. बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहेत. तर 23 नोव्हेंबर रोजी शनिवारी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा:
Pune: भाजप-महायुतीच्या विजयात राष्ट्रवादीचा महत्त्वाचा वाटा : दीपक मानकर





