पुणे – ‘न्यूमोनिया’ झाला असे म्हणताच, आता रूग्ण बरा होईल ना? असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र, न्यूमोनिया कसा झाला, त्या रुग्णाच्या शरिरामध्ये संसर्ग कसा पसरला यावर त्या रुग्णांच्या आजाराची गंभीरता समजते. कम्युनिटी अॅक्वार्डमधून न्यूमोनिया झाला तर तो लवकर बरा होतो. मात्र, रुग्णालयात उपचार घेताना न्यूमोनिया झाला तर त्यांची गंभीरता अधिक असते. त्यामुळे ‘तत्काळ निदान आणि उपचार हेच न्यूमोनियावर रामबाण उपाय’ आहे. याबाबत कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष व मेडिसिन विभागाचे वरिष्ठ डाॅ. डी. बी. कदम यांच्याशी न्यूमोनिया या आजाराचे गांभिर्य, त्यावरील उपाययोजना आणि खबरदारी याबाबत दैनिक “प्रभात’ने चर्चा केली. त्यावेळी डाॅ. कदम म्हणाले, “न्यूमोनिया हा विषाणूजन्य आजार असून, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना होउ शकतो. मात्र, त्यामध्ये वेगेवेगळे प्रकार असून, संसर्ग कुठे झाला, त्याचा विषाणु, जीवाणू कोणते यासह अन्य बाबीमधून न्यूमोनियाची गंभीरता लक्षात येऊ शकते. त्यासाठी लक्षणे दिसताच तत्काळ डाॅक्टरांच्या सल्याने तपासणी व औषधोपचार घेणे आवश्यक आहे.’ न्यूमोनियाचे प्रकार… व्यक्तीच्या श्वसन वाहिन्यांच्या बाजूला न्यूमोनिया झाला तर त्याला ब्रान्को न्यूमोनिया असे म्हणतात. तर वायु कोशांना न्यूमोनिया झाला तर तो सर्वसामान्य न्यूमोनिया असतो. त्यामध्ये लहान मुलांमध्ये ब्रान्को न्युमोनिया अधिक दिसून येतो. लहान मुलांमध्ये व्हायरल न्युमोनियाचे प्रमाण अधिक असते. न्यूमोनिया संसर्ग होण्याची कारणे… न्यूमोनिया हा वेगवेगळ्या जंतूमुळे होतो. मोठ्या व्यक्तींमध्ये विषाणू, जिवाणू आणि बुरशी यापैकी एकाचाही संसर्ग फुफ्फुसाला झाल्यावर न्यूमोनिया होतो. प्रामुख्याने न्यूमोनिया बाधित व्यक्तीला कोणत्या वातावरणातून संसर्ग झाला, हे खूप महत्वाचे आहे. समाजातील वातावरणातून न्यूमोनिया झाल्यावर त्याला कम्युनिटी अॅक्वार्ड असे म्हणतात. तर हाॅस्पिटलमध्ये उपचार घेताना न्यूमोनिया झाल्यावर हाॅस्पिटल अॅक्वार्ड असे म्हणतात. हाॅस्पिटलमधील जंतू प्रतिजैवक औषधांना दाद देत नसल्याने हा जास्त गंभीर आजार असतो. न्यूमोनियाच्या कम्युनिटी अॅक्वार्डममधील दोन प्रकार टिपिकल : या प्रकारामध्ये फुफ्फुसाच्या एका भागाला सूज येते. यामध्ये जिवाणू ठरललेले असतात. निमोकोकल, क्लेप्सेला, हिमोफिलस हे या प्रकारात येतात. त्यावर औषधोपचार करून आजार लवकर बरा होतो. अ टिपिकल : या प्रकारात छोटे छोटे न्यूमोनिया हे फुफ्फसाच्या दोन्ही बाजूला असतात. त्यामध्ये लिझनेल, मायकोप्लाझ्मा असे जीवाणू येतात. यामध्ये रूग्णाची प्रकृती बिघडते आणि त्याला रूग्णालयात दाखल करावे लागते. “चीनमध्ये मायकोप्लाझ्मा हा अटिपिकलमध्ये असलेला जीवाणू आहे. यामुळे फुफ्फुसाच्या दोन्ही बाजूंना संसर्ग होतो आणि व्यक्तीची आॅक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते. फुफ्फुस, लिव्हर, हृदय, किडनी यांना त्रास होवून रूग्णांची प्रकृती बिघडते. त्यामुळे आॅक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लावावा लागतो. त्यावर ठराविक औषधांनी आजार बरा होतो. मात्र, त्यातील काही औषधे लहान मुलांना देता येत नाहीत. त्यांसाठी अन्य औषधांनी या आजारावर नियंत्रण मिळवावे लागते.” – डाॅ. डी. बी. कदम, अध्यक्ष, कोविड टास्क फोर्स आणि वरिष्ठ अधिकारी मेडिसिन विभाग.