पिंपरी – राज्य सरकारने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार महापालिकेत उपायुक्त या अभिनामाची सात पदे मंजूर आहेत. तर, आणखी एक नवीन पद निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आठ पदांपैकी सहा पदांसाठी सहाय्यक आयुक्तांना पदोन्नती देण्यात आली आहे. महापालिकेतील विभागांसाठी विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यास आणि महापालिका आकृतीबंधास राज्य सरकारने मंजूरी दिलेली आहे. त्यानुसार उपायुक्तांची 7 पदे वेतनश्रेणी 15600-39100 ग्रेड पे 6600 मध्ये शासन मंजूर आहेत. तसेच उपायुक्त संवर्गात आणखी एक नवीन पद निर्माण करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याने महापालिकेत उपायुक्तांची आठ पदे झाली आहेत. उपायुक्तांची शासन मंजूर पदे सहाय्यक आयुक्त या संवर्गातून 50 टक्के पदोन्नतीद्वारे भरण्याची आकृतीबंधात तरतूद आहे. तर, 50 टक्के पदे प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याची तरतूद आहे. महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेले आशादेवी दुरूगुडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, संदीप खोत या अधिकाऱ्यांना उपायुक्त पदावर समावेशाने नियमित नियुक्ती करण्यास शासन आदेशानुसार मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे आणि स्मिता झगडे यांना प्रतिनियुक्तीसाठी राखीव असलेल्या उपायुक्त पदांवर नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.