पुणे -शहराच्या मध्यवर्ती भागात सोयीची आणि किफायतशीर बससेवा म्हणून पुणेकरांमध्ये प्रसिद्ध असलेल्या “पुण्यदशम्’ बसमधून प्रवास करत कसब्यातील भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार हेमंत रासने यांनी मंगळवारी पोटनिवडणुकीचा प्रचार केला. पेठ परिसरातल्या वाहतूक कोंडीतून, प्रदूषणातून आणि पार्किंगच्या समस्येतून नागरिकांची मुक्तता करण्याच्या उद्देशाने हेमंत रासने यांच्या कल्पनेतून पुणे महापालिका व “पीएमपी’तर्फे “पुण्यदशम्’ ही योजना साकारण्यात आली. याअंतर्गत मध्यवर्ती पेठांमध्ये 9 मार्गांवर ही मिडी बससेवा सुरू असून, अवघ्या दहा रुपयांत दिवसभर प्रवासाची सोय यामुळे उपलब्ध झाली आहे. सध्या दररोज 20 ते 25 हजार पुणेकर या सेवेचा लाभ घेतात. सार्वजनिक वाहतूकसेवेचा प्रवासीकेंद्री विचार करीत भाजपशासित पुणे महापालिकेने अनेक भविष्यवेधी उपक्रम सुरू केल्याचेही रासने यांनी यावेळी सांगितले. मंगळवारी रासने यांनी “पुण्यदशम्’च्या बसमधून प्रवास करीत बसमधल्या प्रवाशांशी संवाद साधला व त्यांना रोजच्या प्रवासात काही अडचणी येतात का, यासंबंधी विचारणा केली. “या बससेवेमुळे मध्यवस्तीतील विविध बाजारपेठा आणि पेठांमध्ये कामासाठी जाणे अगदी सोयीचे झाले आहे,’ अशा प्रतिक्रिया देत नागरिकांनी रासने यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शहरातील दाट वस्तीच्या मध्यवर्ती भागात सोयीचे ठरणारे पर्यावरणपूरक उत्तर “पुण्यदशम्’ सेवेने शोधलेले आहे. येत्या काळात या सेवेचा पुण्याच्या इतर भागांतही विस्तार करण्याची मनीषा असल्याचे रासने यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या “खलक-ए-खिदमत फाऊंडेशन’तर्फे संस्थेच्या अध्यक्ष रेश्मा रफिक सय्यद यांनी हेमंत रासने यांना पाठिंबा जाहीर केला आहे.