प्रभात वृत्तसेवा पुणे – विवाहाच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनेत दोन युवतींवर बलात्कार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी कोंढवा आणि हडपसर पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहे.कोंढवा पोलिसांनी विवाहाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी अनिकेत राकेश निकाळजे (वय २१, रा. एसआरए वसाहत, कमेला, कोंढवा) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती अल्पवयीन आहे. आरोपी निकाळजे आणि युवतीची ओळख झाली होती. युवतीला विवाहाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. युवतीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देत युवतीला धमकावले. घाबरलेल्या युवतीने नुकतीच तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.दुसरी घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी अभिषेक सरक (रा. घुलेनगर, मांजरी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका युवतीने हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकने युवतीला विवाहाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. युवती गर्भवती झाल्यानंतर तिने विवाहाबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करत आहेत. महिलेचे लैंगिक शोषण.. दरम्यान, विवाहाच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रुपेश बाळू साळवे (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली. साळवेने महिलेला विवाहाचे आमिष दाखवत महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने नकार दिला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.