नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लवकरच अतिरिक्त शुल्क लावण्याचा इशारा दिल्यानंतर काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक मैत्री, नमस्ते ट्रम्प आणि हाऊडी मोदी यांसारखे भव्य कार्यक्रम, बळजबरीच्या मिठी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची स्तुती करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट्स यांचा भारताला कोणताही ठोस फायदा झाला नाही, असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरुन पोस्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. आपल्या पोस्टमध्ये, पंतप्रधानांचे व्हाईट हाऊसमधील चांगले मित्र भारताबाबत कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल भूमिका घेत आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले नाही, तर अमेरिकेत होणाऱ्या भारतीय आयातीवर अधिक शुल्क लावले जाईल, असा इशारा पुन्हा देण्यात आला आला आहे. सर्व भव्य कार्यक्रम आणि जाहीर कौतुक असूनही, ट्रम्प प्रशासन भारतावर दबाव आणतच आहे. या सर्व मैत्रीचा प्रत्यक्ष धोरणात्मक लाभ दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळेच शुल्क वाढीची शक्यता रविवारी फ्लोरिडाहून वॉशिंग्टन डीसीला जात असताना ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, भारताला खूश करायचे होते, मात्र अमेरिकेला भारताच्या रशियन तेल खरेदीबाबत नाराजी आहे, त्यामुळे अमेरिका लवकरच शुल्क वाढवू शकते. त्यांच्या या वक्तव्यावरून भारताच्या परराष्ट्र आणि व्यापार धोरणावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर शुल्क लावण्याची मागणी केली असून, यामध्ये भारताचाही समावेश होतो. त्यामुळेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रभावावर विरोधकांनी आक्रमक धोरण अवलंबले आहे.