पिंपरी | गुरुकुल विद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम

लोणावळा, (वार्ताहर) – आषाढी एकादशी निमित्त येथील गुरुकुल विद्यालयात मंगळवारी (दि.16) पालखी सोहळ्याचे व भजन, अभंग, भारूड, गौळण गीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग असलेल्या वारी सोहळ्याचा अनुभव विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलामुलींना मिळावा, अनुभवता यावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.
शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतीमांचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक बायाजीराव खुरंगे यांनी केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी निर्मळ वारी, हरीत वारी, आरोग्यदायी वारी यांचे महत्त्व विशद केले.
पालखी सोहळ्यात विविध संतांच्या वेशभूषा केलेल्या मुलांनी सहभाग घेतला. शिक्षकांनी व मुलांनी अभंग, भारूड यांचे सुरेल आवाजात गायन केले. सूत्रसंचालन रमेश बोंद्रे यांनी केले. हारमोनियम साथ संजय वरे यांनी तर पखवाजावर दीपक मावकर होते.





