नवी दिल्ली – शेअर बाजारात कमालीची अस्थिरता वाढली आहे. सरलेल्या वर्षात शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी केवळ दहा टक्क्याचा परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत इक्विटी संदर्भातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूक डिसेंबर महिन्यात 6 टक्क्यांनी कमी होऊन 28,054 कोटी रुपये इतकी झाली आहे. मात्र एसआयपीच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक डिसेंबर महिन्यात 31 हजार कोटी रुपये या विक्रमी पातळीवर गेली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेऊन गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला असल्याचे विश्लेषकांनी सुचित केले. इक्विटी म्युच्युअल फंडांना लागलेल्या गळतीमुळे म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता डिसेंबर महिन्यामध्ये किंचित कमी होऊ 80.23 लाख कोटी रुपये इतकी झाली. नोव्हेंबर महिन्यामध्ये हे मालमत्ता 80.80 लाख कोटी रुपये इतकी होती. रोख्यासंदर्भातील म्युच्युअल फंडातूनही बरीच नफेखोरी झाली असल्याची माहिती म्युच्युअल फंड नियंत्रकांनी जारी केली. भांडवल सुलभतेसाठी गुंतवणूकदारांनी रोख्यासंदर्भातील म्युच्युअल फंडातून रक्कम काढून घेतली. शेअर बाजारातील परिस्थितीनुसार आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही बदल केले असल्याचे दिसून येते. डिसेंबर महिन्यात गुंतवणुकीपेक्षा 66,591 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत. एसआयपीच्या माध्यमातून रिटेल गुंतवणूकदारांनी डिसेंबर महिन्यामध्ये 31 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. नोव्हेंबर महिन्यामध्ये हे गुंतवणूक 29,445 कोटी रुपये इतकी होती. सध्याच्या बाजारातील अनिश्चिततेच्या परिस्थितीत गुंतवणूकदार एसआयपीचा आधार घेत असल्याचे दिसून येते. यामुळेच आर्थिक वर्ष 2025 मध्ये एसआयपीच्या माध्यमातून झालेली एकूण गुंतवणूक 3.34 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. विश्लेषकांनी सगितले की, मिड कॅप व स्मॉल कॅपमधील कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याची भावना गुंतवणूकदारांच्या मनात आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी झाली आहे. मात्र भारतीय शेअर बाजारावर गुंतवणूकदारांचा दीर्घ पल्ल्यातील विश्वास कायम आहे असे सांगण्यात आले. सोन्याचे दर दरम्यानच्या कालावधीत वाढल्यामुळे सोन्याच्या संदर्भातील गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडात डिसेंबर महिन्यात 11,647 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. नोव्हेंबर महिन्यात ही गुंतवणूक 3,742 कोटी आणि ऑक्टोबर महिन्यात 7,743 कोटी रुपये होती. सोन्याचे दर वाढत असल्यामुळे आगामी काळातही हे क्षेत्र गुंतवणूकदारांना आकर्षक वाटण्याची शक्यता आहे. सरलेल्या वर्षांमध्ये सोन्याने जवळजवळ 70 टक्के इतका परतावा दिला आहे.