कराड -कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने सन 2019-20 या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये 90 कोटीची आर्थिक उलाढाल केली असून 2 कोटी 75 लाख एवढा व्यापारी नफा तर तरतूद पूर्व नफा एक कोटी 67 लाख इतका मिळवला असल्याची माहिती संघाचे चेअरमन रंगराव थोरात यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर व जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या खरेदी-विक्री संघामध्ये कराड संघाचे स्थान आहे. संस्थेच्या 27 शाखा असून या शाखांच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांना सेवा पुरवण्याचे काम केले जाते. सांगली येथे हळद व बियाण्यांचा व्यवसाय संघामार्फत केला जातो.
इंडियन ऑईल कंपनीचे चार डिझेल-पेट्रोल पंप कार्यरत असून डिझेल-पेट्रोल वाहतूक करण्यासाठी अद्ययावत असे तीन टॅंकर आहेत. टाटा कंपनीची संस्थेकडे एजन्सी असून पन्हाळी पत्रा, कोटेड पत्रा, शेतकऱ्यांना माफक दरात पुरवला जातो. फिनोलेक्स पाइपची संस्थेकडे एजन्सी असून कराड पाटण परिसरातील शेतकऱ्यांना पाईप पुरवली जाते. खत कंपन्यांचीही डीलरशिप संस्थेकडे असून यामध्ये झुआरी, ईफको, महाधन, आरसीएफ यासह कंपनीची खते संघाच्या मुख्य कार्यालयासह तालुक्यातील शाखांमार्फत शेतकऱ्यांना विक्री केली जातात.
संघामार्फत कराड येथे रयत बझार, बी-बियाणे, औषधे यासह शेतीओजारे, शेतीपूरक वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू पुरवल्या जातात. कराड व शेणोली येथे भात गिरणी, कराड येथे अद्ययावत वजनकाटा शेती व अनुषंगिक विक्रीची दालने संघामार्फत वर्षभर चालू ठेवली जातात. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. संघाच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला होता. मात्र, अशा परिस्थितीतही शासनाच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांना घरपोच सेवा देण्याचे काम संस्थेच्या शाखामार्फत चालू ठेवले होते. अशा संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांना सेवा देत शेतकरी हिताची धोरणे संघामार्फत राबवली आहेत.
प्रतिवर्षी शंभर कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल करणाऱ्या राज्यातील मोजक्या खरेदी-विक्री संघामध्ये कराड संघाचे स्थान असून ही किमया मार्गदर्शक विलासराव पाटील यांचे नेतृत्व व तालुक्यातील शेतकऱ्याचा विश्वास यामुळे शक्य झाली आहे. संस्थेचे व्हाईस चेअरमन अनिलराव मोहिते, व्यवस्थापक शशिकांत पाटील, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचा संघाच्या यशात महत्वपूर्ण योगदान असल्याचे थोरात म्हणाले.