Jamkhed News : अहिल्यादेवींच्या पावन भूमीत घडलेल्या प्रकारावर प्रा. राम शिंदेंकडून दिलगिरी व्यक्त
Jamkhed News : या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या घटनेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली असून आयोजक, चौंडी ग्रामस्थ व स्वतःच्या वतीने सर्व अहिल्या भक्तांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे नुकत्याच पार पडलेल्या रथयात्रा उत्सवात नृत्यांगनांच्या नृत्यविष्काराचा प्रकार समोर आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेसमोर अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्याने अहिल्या भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले.या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या घटनेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली असून आयोजक, चौंडी ग्रामस्थ व स्वतःच्या वतीने सर्व अहिल्या भक्तांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
हा अनुचित प्रकार घडल्याचे लक्षात येताच संबंधित आयोजकांना त्याच वेळी समज देण्यात आली होती. सोशल मीडियावर शिवसेनेचे पांडुरंग माने व आहिल्या भक्तानी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आयोजकांना पुन्हा एकदा या गंभीर चुकीची जाणीव करून देण्यात आली. आयोजकांनी आपली चूक मान्य करत सर्व अहिल्या भक्तांची जाहीर माफी मागितली आहे.
तसेच, भविष्यात चौंडी किंवा परिसरातील कोणत्याही कार्यक्रमात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही आणि उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल, अशी ग्वाही आयोजक व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.
बॅनरवर फोटो लावणे चुकीचेच: प्रा. राम शिंदे
या घटनेवर स्पष्टीकरण देताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, “चौंडीसह आजूबाजूच्या नान्नज, जवळा, चापडगाव यांसारख्या गावांमध्ये वर्षांनुवर्षे पारंपरिक पद्धतीने रथयात्रा उत्सव साजरा होतो व तेथे कलाविष्कार सादर केले जातात. मात्र, अशा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाठीमागील फलकावर (बॅनर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो लावणे हे अत्यंत चुकीचे होते.”




