माळेगाव – शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे तंत्रज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालय, माळेगाव बु. येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक प्रा. अमितकुमार रामचंद्र शेलार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत विद्यापीठीय डॉक्टर पदवी (पीएच.डी.) बहाल करण्यात आली आहे. ही माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप शहा यांनी दिली. प्रा. शेलार यांनी “एच-१३ स्टीलच्या रासायनिक संरचनेत विविध मिश्रधातू घटकांची भर घालून त्याचा सूक्ष्मरचनात्मक बदल व यांत्रिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासणे” या विषयावर सखोल संशोधन केले. या संशोधनात एच-१३ स्टीलमध्ये विविध धातूंची भर घालून त्याच्या सूक्ष्मरचनेत होणारे बदल आणि त्याचा ताकद, टिकाऊपणा यांसारख्या गुणधर्मांवर होणारा परिणाम तपासण्यात आला. उद्योग, धातुविज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात उपयुक्त ठरेल असे या संशोधनाचे निष्कर्ष असून, प्रगत अभियांत्रिकी संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान मानले जात आहे. या संशोधनासाठी शेलार यांना पंढरपूर येथील एसव्हीईआरआय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रात प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेलार यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रयोग, विश्लेषण आणि निष्कर्षांची मांडणी करून संशोधन पूर्ण केले. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. संदीप शहा, संस्थेचे सचिव डॉ. डी. जी. ठोंबरे, विश्वस्त तसेच शिक्षक मंडळींनी शेलार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या संशोधनपर परंपरेत भर पडली असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.