रशियाकडून लष्करी सामग्री खरेदी करणे भारतासाठी धोक्याचं; अमेरिकेचा सूचक इशारा

वॉशिंग्टन – भारताने रशियाकडून लष्करी सामग्री खरेदी करणे भारताच्या हिताचे नाही असे अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. भारताने रशियन लष्करी उपकरणावरील आपले अवलंबित्व कमी करावे अशी बिडेन प्रशासनाची इच्छा आहे असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकन संसदेच्या लष्कर विषयक समितीपुढे ते बोलत होंते.
रशिया-युक्रेन संघर्षामध्ये भारताने रशियाच्या बाजूने आपली भूमिका बजावली असल्याने अमेरिकेतील सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या दोन्ही बाजुंच्या संसद सदस्यांनी भारतावर आपली नाराजी व्यक्त केली आहे याकडेही विल्सन यांनी लक्ष वेधले. संयुक्तराष्ट्रांतील रशिया विरोधी मतदानावर भारताने बहिष्कार टाकला तसेच युक्रेन वर रशियाने जो हल्ला केला त्याबाबतही भारताने निषेधाचा सूर काढलेला नाही या बाबीही खटकणाऱ्या आहेत असेही त्यांनी नमूद केले.
भारताने रशियाकडून एस -400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केल्याबद्दलही अमेरिकी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेकडे जगातील सर्वोत्कृष्ट शस्त्र प्रणाली आणि जगातील सर्वात प्रगत शस्त्रे आहेत, असे सूचक उद्गारही ऑस्टिन यांनी यावेळी काढले. ही क्षेपणास्त्र प्रणाली आम्हीही भारताला पुरवू शकतो असे ते म्हणाले.
भारतासारख्या मोठ्या राष्ट्रांबरोबर काम करण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत पण त्या आधी रशियाबरोबरच्या संरक्षण करारांबाबत भारताने योग्य भूमिका घेण्याची अपेक्षाहीं त्यांनी व्यक्त केली. हा व्यवहार सुरू ठेऊन भारत अमेरिकेच्या निर्बंधांना स्वत:हून आमंत्रित करणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

