Pune : नोकरी पोलिसाची, चाकरी अवैध धंदेवाल्यांची

पुणे : पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अवैध धंद्यांवर छापे टाकण्याचे आदेश दिल्यानंतर ती माहिती हुक्का पार्लरचालकाला देणार्या परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकाला अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी निलंबित केले आहे.
विशाल पवार असे कारवाई करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो वानवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीला होता. तेथून राज्य राखीव पोलीस बलातील अकरा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्याला कार्यमुक्त करण्यात आले होते. तरीही, तो प्रशिक्षणाच्या ठिकाणाहून हॉटेलचालकांना पोलिसांच्या नियोजित कारवाईची माहिती देत होता.
वानवडी हद्दीत ११ ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत, त्यावर कारवाईबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी आदेश दिले होते. लुल्लानगर येथील विजेता रुफटॉप हॉटेल येथे छापा कारवाईचे वेळी हॉटेलचालक राहुल जैनसिंघाल याचा मोबाइल ताब्यात घेण्यात आला होता. त्यात हुक्का पार्लरसंदर्भात इतर माहिती मिळते का ? हे पाहण्यासाठी पोलिसांनी मोबाइल तपासणी केली. त्यात वानवडी बाजार पोलीस चौकी येथे नेमणुकीस असलेले परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार याचा मोबाइल नंबर जैनसिंघाल याने “पीएसआय पवार सर वानवडी न्यू’ या नावाने सेव्ह केला होता. त्याला पवार याने २६ डिसेंबरला रात्री २० वाजून ४३ मिनिटांनी कॉल केल्याचे दिसून आले. या प्रकरणी राहुल जैनसिंघाल याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने विशाल पवार याचा मेसेज व कॉल आला होता.
त्यामुळे सतर्क होऊन हुक्का सर्व्हिस बंद करीत असताना पोलिसांची रेड झाली, असे लेखी जबाबात सांगितले. तसेच विशाल पवार याला महिन्याला २० हजार रुपये देत असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच सुटीवर असणारे बीट मार्शल हरिश्चंद्र पवार याने देखील जैनसिंघाल याला व्हॉटसअप कॉल केल्याचे आढळून आले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे व्हाट्सअॅप ग्रुपवर २६ डिसेंबर २०२४ रोजी पुणे शहरातील वानवडी, कोंढवा, काळेपडळ, लष्कर, कोरेगाव पार्क व विमाननगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हुक्का पार्लर सुरु असल्याचा संदेश पाठवला होता.





