प्रो-कबड्डी लीग | पाटणाची दिल्लीशी अंतिम लढत

बेंगळुरू – प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने बलाढ्य युपी योद्धाचा पराभव केला व थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत दबंग दिल्लीने बेंगळउरू बुल्सवर मात करत अंतिम फेरी निश्चित केली.
पहिल्या सामन्यात पाटणा संघाने युपी संघाचा 38-27 असा पराभव करताना युपीचा स्टार खेळाडू व डुबकी किंग प्रदीप नरवालवर संपूर्ण वर्चस्व गाजवले व त्याचा प्रभाव कमी करण्यात यश मिळवले. या स्पर्धेत सातत्याने रेड व टॅकल गुणांत आघाडी घेतलेल्या नरवालला या सामन्यात केवळ 4 गुण मिळवता आले. तसेच यंदाच्या स्पर्धेत भरात असलेल्या सुरींदर गीलही साफ अपयशी ठरला.
पाटणाकडून गुमान सिंग, सचिन व सुनील यांनी अफलातून आक्रमण करत युपी संघाला दडपणाखाली राखले व संघाला विजय प्राप्त करुन दिला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात दबंग दिल्लीने निर्विवाद वर्चस्व राखताना बेंगळुरु बुल्सचा 40-35 असा पराभव केला व थाटात अंतिम फेरी गाठली. हा सामना रोमहर्षक ठरला मात्र, स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या बेंगळुरु बुल्स संघाला या सामन्यात मात्र, चमकदार खेळ करता आला नाही. बेंगळुरूच्या पवन कुमारने दिल्लीवर दडपण आणले होते. परंतू दिल्लीच्या नवीन कुमार व निरज नरवालने अखेरच्या सत्रात खेळ उंचावत संघाला विजय प्राप्त करुन दिला.





