Priyanka Gandhi – काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हरियाणातील फरीदाबाद येथील जमीन खरेदी प्रकरणातील आरोपपत्रात ईडीने प्रियांका गांधी यांच्या नावाचा समावेश केला आहे. आरोपपत्रात त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, आरोपपत्रात प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आलेले नाही.
‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) संबंधित खटल्याच्या आरोपपत्रात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हटले आहे की रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी दिल्लीस्थित रिअल इस्टेट एजंटमार्फत हरियाणात जमीन खरेदी केली होती. या एजंटने एनआरआय व्यावसायिक सीसी थंपी यांनाही जमीन विकली.
सूत्रांवर विश्वास ठेवला तर, ईडीच्या आरोपपत्रात प्रियंका गांधी वाड्रा यांचा प्रथमच उल्लेख करण्यात आला आहे. सीसी थंपी आणि सुमित चड्ढा यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात प्रियांका गांधी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. रॉबर्ट वाड्रा आणि थंपी यांच्याशिवाय प्रियंका गांधी यांनीही फरीदाबादमध्ये जमीन खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. संजय भंडारी यांचे निकटवर्तीय थंपी आणि वाड्रा यांच्यातील आर्थिक संबंधाच्या तपासादरम्यान ही बाब समोर आली आहे.
हे प्रकरण फरिदाबादमधील जमीन खरेदीशी संबंधित आहे. माहितीनुसार, 2005-2006 दरम्यान रॉबर्ट वाड्रा यांनी फरिदाबादच्या अमीपूर गावात एचएल पाहवा प्रॉपर्टी डीलरमार्फत सुमारे 40.8 एकर जमीन खरेदी केली होती, जी डिसेंबर 2010 मध्ये त्यांनी पाहवा यांना परत विकली. त्याचप्रमाणे एप्रिल 2006 मध्ये याच अमीपूर गावात प्रियंका गांधी वड्रा यांच्या नावावर घर खरेदी करण्यात आले होते, जे फेब्रुवारी 2010 मध्ये पाहवा यांना परत विकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाहवा हा थम्पीच्या अगदी जवळ आहे, पाहवानेच अमीपूर गावात थम्पीची जमीन खरेदी केली होती.