Priyanka Gandhi : प्रियांका गांधींना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर; ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आता भारताच्या राजकारणामध्ये आणखी एका गांधींची एन्ट्री झाली आहे. प्रियांका गांधी यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमदेवारी जाहीर केली आहे.
राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून राजीनामा दिल्यामुळे तिथे पोटनिवडणूक होणार आहे. वायनाडमध्येही 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. वायनाडमधून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विजय मिळवला होता. पण त्यांनी रायबरेलीतून खासदार राहण्याचा पर्याय निवडलाय.
यामुळे आता वायनाडमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी मैदानात उतरतील. आतापर्यंत पडद्यामागे राहिलेल्या प्रियांका गांधी पहिल्यांदाच थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. वायनाड हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. 2008 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना केल्यानंतर वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला.
2008 पासून आतापर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. प्रियांका गांधी गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रीय आहेत. पण त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. वायनाड मतदारसंघाबाबत बोलायचं तर याठिकाणी 48 टक्के मुस्लिम मतदार आणि ४१ टक्के हिंदू मतदार आहेत.





