Priyanka Chopra: बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रियंका चोप्रा आज जागतिक स्तरावर प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र, तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटसृष्टीतून झाली होती, हे अनेकांना माहीत नाही. २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘थमिझन’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटात तिच्यासोबत सुपरस्टार थलपती विजय दिसले होते. ‘थमिझन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी ठरला असला, तरी प्रियंकाच्या अभिनयाने आणि स्क्रीन प्रेझेन्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आणि हळूहळू स्वतःची भक्कम ओळख तयार केली. फॅशन, डॉन आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनली. प्रियंका चोप्राने केवळ भारतीय चित्रपटसृष्टीपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठे यश मिळवले. तिची वेब सिरीज सिटाडेल जगभरात गाजली आणि तिच्या कामाचे भरभरून कौतुक झाले. या सिरीजसाठी तिला मोठे मानधन मिळाल्याचेही सांगितले जाते, जे तिच्या ग्लोबल स्टारडमचे प्रतीक आहे. Priyanka Chopra माध्यमांच्या अहवालानुसार, प्रियंका चोप्राची एकूण संपत्ती सुमारे ५८३ कोटी रुपयांच्या आसपास आहे. अभिनयासोबतच ती एक यशस्वी व्यावसायिक महिला देखील आहे. ती अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तसेच तिने स्वतःचा हेअर केअर ब्रँड सुरू केला असून विविध स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकही केली आहे. फॅशन, ब्युटी, फूड आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातही तिचा सक्रिय सहभाग आहे, ज्यामुळे तिच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. प्रियंका चोप्राच्या वैयक्तिक आयुष्याचीही नेहमीच चर्चा होत असते. तिने आंतरराष्ट्रीय गायक निक जोनास याच्याशी लग्न केले आहे. रिपोर्ट्सनुसार, या दोघांची एकत्रित संपत्ती १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आणि ते अत्यंत आलिशान जीवनशैली जगतात. साऊथ चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी प्रियंका चोप्रा आज एक जागतिक आयकॉन बनली आहे.