बेळगावी : भाजपला कर्नाटकातील विरोधी पक्ष म्हणून भान राहिले नाही. मक्यासाठी आधारभूत किंमत, उसासाठी एफआरपी केंद्राकडून ठरवली जाते. मात्र, ते केंद्र सरकरच्या अखत्यारित येणाऱ्या गोष्टींवर गप्प राहात आहेत. त्यांना जे करायचे ते करु द्या, त्यांनी कर्नाटकातील विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी सोडली आहे. त्यांनी केवळ क्षुल्लक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे, अशी टीका कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी सोमवारी विधानसभा अधिवेशनापूर्वी केली. सोमवारपासून कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी प्रियांक खरगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून कर्नाटकचे मोठ्या प्रामाणात देणी बाकी आहेत. परंतू त्यावर कर्नाटकातील भाजप लक्ष्य केंद्रीत करत नाही. त्याऐवजी भाजप असंबंध मुद्दे उपस्थित करत आहे. जल जीवन मिशनमध्ये राज्य सरकारचे 13 हजार कोटी केंद्राकडून येणे बाकी आहे. मनरेगासाठी 15 वित्त आयोगाचे वाटप बाकी आहे. एवढे मुद्दे असताना, भाजपचा रोख कशा कडे ? तर नाश्ता करताना दोन्ही नेत्यांनी महागडी घड्याळे घातली होती. ही कर्नाटकमधील विरोधी पक्षांची बौद्धीक क्षमता आहे, अशी टीका त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.