जळगाव : शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणाच्या स्ट्राँग रुमबाहेर स्वतःचे खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. एकीकडे भाजपकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आमदाराला प्रशासन आणि पोलिसांवर भरोसा नसल्याचे चित्र आहे. या दोन्ही ठिकाणी सरकारी सुरक्षा यंत्रणेसह गणवेशधारी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. दोन्ही शहरांमध्ये नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार सामना रंगलेला आहे. अधिकृत चोख पोलिस बंदोबस्त असतानाही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमल्याने ईव्हीएम सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. स्ट्राँग रुम बाहेर नेमलेले सुरक्षारक्षक इथल्या परिसरावर करडी नजर ठेवत आहेत. या सर्व घडामोडींमुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे.