Accident News : बेलसरमध्ये खाजगी शाळेच्या बसला अपघात
Accident News : बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सासवड : कल्याणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसला शनिवारी (दि. १९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बेलसर येथील भगवंती परिसरात अपघात झाला. समोरून आलेल्या पिकअपने अचानक कट मारल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत असून बस रस्त्यालगतच्या चारीत जाऊन आदळली. बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल आयोजित केली होती. त्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन बस बेलसर परिसरातून जाताना भगवंती परिसरात समोरून आलेल्या पिकअपने बसला कट मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे बसचालकाला बस रस्त्याच्या बाजूला घेणे भाग पडले. त्यानंतर बस चारीत जाऊन आदळली.
अपघातानंतर बसमधील विद्यार्थ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मोठा अपघात टळल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर वाहनाचा विमा नसल्याची देखील चर्चा आहे. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत केली.
जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताची पाहणी करून घटनेची माहिती घेतली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, पिकअप वाहनाची भूमिका काय होती आणि बसचालकाकडून कोणती काळजी घेण्यात आली होती, याबाबत तपास सुरू केला आहे.
वाहनांच्या विम्यावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. परिसरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या विम्याबाबतही चर्चा सुरू असून, त्याबाबत संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





