Prithviraj Chavan | BJP – ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपने गुरुवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चव्हाण यांची टिप्पणी देशविरोधी असून, त्यामुळे भारतीय लष्कराचा अपमान झाला आहे, असा आरोप करत काँग्रेसने त्यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपने केली. भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी सांगितले की, ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पाकिस्तानसोबतच्या हवाई संघर्षात पूर्णपणे पराभव झाला असल्याचा चव्हाण यांचा दावा अत्यंत आक्षेपार्ह आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईबाबत चव्हाण यांनी केलेले विधान लष्कराचे मनोबल खच्ची करणारे असल्याचे इस्लाम म्हणाले. टीकेनंतरही चव्हाण यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिल्याबद्दल भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणावर काँग्रेस नेतृत्वाने मौन बाळगल्याचा आरोप करत, हीच पक्षाची मानसिकता असल्याचे भाजपने म्हटले. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी देशाची माफी मागावी आणि पृथ्वीराज चव्हाण यांना तात्काळ काँग्रेसमधून काढून टाकावे, अशी ठाम मागणी सय्यद जफर इस्लाम यांनी केली.