पुणे : येरवडा कारागृहात सराईत गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका कैद्याचा उपचारादरम्यान ससून सर्वोपचार रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नागनाथ कांबळे (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जयजवाननगर, येरवडा) आणि दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे, चंडालिया आणि रेड्डी यांच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कांबळे याने २०१९ मध्ये एका व्यक्तीचा खून केला असून, त्या प्रकरणात तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. तसेच चंडालिया आणि रेड्डी यांनाही गंभीर गुन्ह्यांप्रकरणी अटक करण्यात आली होती. तिघेही एकाच बराकीत राहत होते. कारागृहातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून कांबळे याचा चंडालिया आणि रेड्डी यांच्याशी वाद झाला होता. या वादातून कांबळे याला मारहाण करण्याचा कट चंडालियाने रचल्याचे तपासात उघड झाले आहे. सोमवारी (१५ डिसेंबर) सकाळी बराकीत झोपेत असताना चंडालिया आणि रेड्डी यांनी अणकुंटीदार फरशीच्या तुकड्याने कांबळे याच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर घाबरलेले इतर कैदी बराकीतून बाहेर पळाले. घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी कांबळे याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.