पुणे : वाहतूक कोंडीमुळे प्रभागातील नागरिकांसह खरेदीसाठी येणाऱ्या पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, याचा थेट परिणाम व्यापारी व्यवहारांवरही होत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येमुळे अनेक नागरिक बाजारपेठेत येणे टाळत असल्याने निवडून आल्यानंतर वाहतूक व्यवस्थापनावर प्राधान्याने काम करण्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ–नाना पेठ) मधील भाजपच्या ‘क’ सर्वसाधारण गटाच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा तेजस गडाळे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श आराखडा नागरिकांसमोर मांडला. जातीधर्माच्या आधारावर किंवा भावनिक मुद्द्यांवर मतांची मागणी न करता मूलभूत नागरी प्रश्नांवर आधारित विकास मॉडेल राबवण्यावर भर दिला जाईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. रस्ते विकास, मुबलक पाणीपुरवठा व्यवस्था, पथदिवे तसेच प्रामुख्याने वाहतूक समस्या आणि ड्रेनेज लाईनचे नूतनीकरण व दुरुस्ती या बाबींना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग २३ हा पुणे शहराचा मध्यवर्ती व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा भाग असल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे ऋतुजा यांनी नमूद केले. याशिवाय, प्रभागात मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामांमुळे अस्तित्वातील जुन्या ड्रेनेज लाईन कमी पडत असून, या लाईन बदलून मोठ्या आकाराच्या लाईन प्रभागात टाकण्यासाठी प्राधान्याने काम केले जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.