Satara: पाणीपुरवठा आणि जलसंधारणाला प्राधान्य द्या, डॉ. प्रिया शिंदे; जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभा
Satara सभेमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, लघुपाटबंधारे, जलसंधारण, सामाजिक वनीकरण, वन विभाग आणि महावितरण विभागांतर्गत विविध योजना व कामांचा आढावा घेण्यात आला. टंचाईग्रस्त गावांसाठी राबविण्यात येणार्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणार्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेची माहिती देण्यात आली.

Satara: ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी, सिंचन व मूलभूत सुविधा देण्याची प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. विविध विभागांनी समन्वयाने प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सौ. प्रिया शिंदे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती राजू भोसले, शिक्षण, अर्थ व क्रीडा समिती सभापती तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. ऋतुजा शिंदे, समाजकल्याण समिती सभापती ऋषीकेश धायगुडे-पाटील, जलव्यवस्थापन समिती सदस्य गिरीश बनकर, मदन काळभोर, सौ.विद्या वेताळ, सौ. जयश्री भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे व अधिकारी उपस्थित होते.
सभेमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, लघुपाटबंधारे, जलसंधारण, सामाजिक वनीकरण, वन विभाग आणि महावितरण विभागांतर्गत विविध योजना व कामांचा आढावा घेण्यात आला. टंचाईग्रस्त गावांसाठी राबविण्यात येणार्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणार्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेची माहिती देण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुंभार यांनी दिली. उपवनसंरक्षक कार्यालयामार्फत दुर्गम व दुष्काळी भागातील वनक्षेत्रात पाणवठे करणे आणि वनक्षेत्रातील चारा उपलब्धतेसाठी उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आली. वनक्षेत्रातील जनावरांना चारा व स्थानिकांना रोजगार उपलब्ध मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मृद संधारणाची कामे कृषी विभागाने करण्याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती दिली. लघुपाटबंधारे विभागाचे जिल्ह्यात केवळ चार उपविभाग कार्यरत असल्याने, कर्मचार्यावर अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे वाई, महाबळेश्वर, व खंडाळा येथे स्वतंत्र लघुपाटबंधारे विभागाची निर्मितीचा ठराव करण्यात आला.
नद्यांवरील बंधारे, नाल्यांची कामे पूर्ण करणे, पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे आणि जलसाठ्यांची क्षमता वाढवणे यावर विशेष भर देण्यात आला. पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नळ पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करुन, नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजना, महावितरणच्या गावठाण, नळ पाणीपुरवठा योजनांशी संबंधित विद्युत जोडण्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. समितीचे सचिव राहुल गावडे यांनी आभार मानले.





