प्रिन्स हॅरी यांना ब्रिटनमध्ये संरक्षण नाही; निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्याची हॅरी यांची तयारी

लंडन – ब्रिटनचे युवराज प्रन्स हॅरी, त्यांच्या पत्नी मेघन मर्केल आणि मुले आर्ची आणि लिलीबेट यांना ब्रिटनच्या भूमीवर संरक्षण देण्यात येऊ नये असे आदेश ब्रिटनच्या गृह विभागाने दिले आहेत. या संरक्षणाचा खर्च प्रिन्स हॅरी यांनी स्वतः जरी उचलला तरी त्यांना संरक्षण पुरवण्यात येऊ नये असे या आदेशांमध्ये म्हटले आहे. गृह विभागाच्या या आदेशांविरोधात प्रिन्स हॅरी यांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राजघराण्यातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
प्रिन्स हॅरी उर्फ ड्युक ऑफ ससेक्स यांनी 2020 मध्येच राजघराम्याचे सर्व अधिकार सोडून दिले आहेत. भविष्यात आपण जेंव्हा ब्रिटनमध्ये येऊ तेंव्हा आपल्या संरक्षणावरील खर्च ब्रिटनच्या नागरिकांच्या करातून मिळालेल्या महसूलातून केला जाऊ नये. हा खर्च आपण स्वतः भरण्यास तयार असल्याचे प्रिन्स हॅरी यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या या अपेक्षाला ब्रिटनच्या गृह विभागाने मान्यता दिलेली नाही.
महाराणी एलिझाबेथ यांचे नातू आणि राजघराण्याचे सहाव्या क्रमांकाचे वारसदार असलेल्या हॅरी यांनी खासगी सुरक्षा नेमण्याच्या हक्कांसाठी न्यायालयात दाद मागायचे ठरवले आहे. ह्ररी आणि त्यांचे कुटुंबीय सध्या कॅलिफोर्नियामध्येच रहात आहेत. आपले आजोबा प्रिन्स फिलीप यांच्या दफनविधीसाठी आणि नंतर आई प्रिन्सेस डायना यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी असे दोनच वेळा ते ब्रिटनमध्ये आले होते.




