नवी दिल्ली : देशभरात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत मात्र त्याअगोदर देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड अशा राज्यांचा समावेश आहे. एकीकडे देशातील १९ विरोधी पक्षांची नुकतीच भाजपाविरोधातील आघाडीसाठी पाटण्याला बैठक झाली त्यावेळी आपने अलिप्ततेचे धोरण स्वीकारले आहे. परंतु भाजप आणि पंतप्रधानांन आपच्या टार्गेटवर नेहमीच असतात.
आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आज एक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये “खोटं बोला, पुन्हा पुन्हा खोटं बोला”, असा मजकूर पोस्ट करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका भाषणातला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवरही “एवढं मोठं असत्य?” असे लिहिण्यात आले आहे.
झूठ बोलो.. बार-बार झूठ बोलो.. pic.twitter.com/ukpLn7iUPk
— AAP (@AamAadmiParty) June 27, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील विकासाच्या मुद्द्यांविषयी भूमिका मांडताना या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडीओ नेमका कधीचा किंवा कुठला आहे? याविषयी ट्वीटमध्ये कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
“आज भारतात दर आठवड्याला एक नवीन विद्यापीठ उभं राहात आहे. तर तिसऱ्या दिवशी एक अटल टिंकरिंग लॅब उभी राहात आहे. तर दोन दिवसांत एक नवीन महाविद्यालय तयार होत आहे. दररोड एक नवीन आयटीआयची स्थापना होत आहे. भारतात दरवर्षी एक नवीन आयआयटी आणि आयआयएम तयार होत आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ आणि त्यातील दावे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.