पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा; विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण

PM Modi In Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शनिवारी 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मोदी मुंबईत येणार आहे.
कसे असणार कार्यक्रमाचे नियोजन ?
पंतप्रधान मोदी शनिवारी मुंबईतून सुमारे 29,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. नवी मुंबईतील तुर्भे येथे मध्य रेल्वेच्या कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनलची पायाभरणी करतील. यासोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्ताराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान वांद्रे कुर्ला संकुलातील आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन करतील. याशिवाय ते मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सभेला संबोधित करणार आहेत.
कसा आहे प्रकल्प?
मुंबई महापालिकेने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. हा मार्ग सुमारे 12.20 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यानच्या प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरुन 25 मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर अंतराच्या जुळा बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे.
हा जुळा बोगदा जमिनीखाली 20 ते 160 खोल भागात आहे. प्रत्येकी 300 मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील. मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाचीही बचत होणार आहे. कारण यामुळे गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी 75 मिनिटांवरून सुमारे 25 मिनिटे होईल. या जुळा बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत ठाणे ते बोरिवलीदरम्यान ये – जा करणाऱ्या प्रवाशांना घोडबंदर रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांमुळे या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होताना दिसतो. हे टाळण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत ठाणे ते बोरिवली यादरम्यान दोन भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा:
“आमदार पैसे घेऊन फुटले आणि…”; विधानपरिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया





