पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नवी दिल्ली – नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर हे पहिलेच संमेलन आहे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी या काळात होत आहे. संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याने मंचावरील मान्यवरांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मावळते संमेलनाध्यक्ष नियोजित संमेलनाध्यक्षांना सूत्र सोपवत असतात.
साहित्य संमेलनाच्या ९७ वर्षांच्या इतिहासात अपवाद वगळता ही परंपरा काटेकोरपणे पाळण्यात आली आहे. परंतु, यंदा पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या परंपरेला फाटा दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, १९५४ मध्ये दिल्ली येथे शेवटचे संमेलन प्रसिद्ध कोशकार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले होते.





