मुंबई – मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी, 13 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे.
मुंबई महापालिकेने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. हा मार्ग सुमारे 12.20 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यानच्या प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरुन 25 मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर अंतराच्या जुळा बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. याच जुळा बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत ठाणे ते बोरिवलीदरम्यान ये – जा करणाऱ्या प्रवाशांना घोडबंदर रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांमुळे या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होताना दिसतो. हे टाळण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत ठाणे ते बोरिवली यादरम्यान दोन भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गाचे बांधकाम झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून वेळेची बचत होणार आहे.