पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अपात्रतेची भीती, डिग्रीवरून “आप’चा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा मुद्दा समोर आल्याने संपूर्ण भाजप हादरला आहे. भाजपचे सर्व मंत्री आणि प्रवक्ते पंतप्रधानांची पदवी बनावट नाही हे सिद्ध करण्यासाठी सरसावले आहेत. पंतप्रधानांना देशासमोर सत्य उघड झाले आणि जर त्यांच्या पदव्या खोट्या निघाल्या तर ते लोकसभेचे सदस्यत्व गमावतील अशी भीती वाटत आहे, असा आरोपही आपचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी केला.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय सिंह बोलत होते. गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात विद्यापीठाला मोदींच्या पदवीची माहिती देण्यास सांगणारा केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश रद्द केल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने या मुद्द्यावर नव्याने हल्ला चढवला आहे.
संजय सिंह म्हणाले, 2016मध्येही “आप’ने हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा आणि तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत मोदींच्या पदव्या दाखवल्या होत्या. परंतु त्या पदव्या बनावट निघाल्यास ते निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली म्हणून अपात्र होतील. यामुळे ते खासदार राहणार नाहीत किंवा निवडणूक लढवण्यासही पात्र राहणार नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात आप सरकारचा भ्रष्टाचार उघड झाल्याने केजरीवाल पंतप्रधान मोदींवर हल्ला करत आहेत, असा पलटवार भाजपने केला आहे.





