पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ममतांना मदतीचे आश्वासन
Updated On:

कोलकाता – पश्चिम बंगाल मधील पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. पश्चिम बंगाल मधील पुरस्थितीबाबत केंद्र सरकार तर्फे आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल असे आश्वासन पंतप्रधानांनी त्यांना दिले आहे.
राज्यात पुरामुळे जे नुकसान झाले आहे त्या संबंधातील अहवाल आपण केंद्राला लवकरच पाठवू असे ममतांनी मोदींना यावेळी सांगितले. राज्यातील नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम तातडीने हाती घेतले जात आहे.
पुरामुळे पश्चिम बंगालच्या तीन लाख लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवावे लागले आहे. तसेच यामुळे विविध ठिकाणी जी पडझड झाली त्यात किमान पंधरा जण ठार झाले आहेत असेही राज्यांच्या सूत्रांनी म्हटले आहे.





