IPL 2021 खेळण्यासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत पंतप्रधान मॉरिसन यांची कठोर भूमिका

सिडनी – भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दररोज ३ लाखांहून अधिक बाधित सापडत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. रुग्णांना उपचारांसाठी बेड्स, ऑक्सिजन व रेमडीसीवीरसारख्या औषधांसाठी भटकावं लागतंय. तसेच करोनाच्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढत असल्याने स्मशानभूमीबाहेरही रांगा लागल्याचे भयावह चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. असं असताना देखील, भारतात IPL क्रिकेट स्पर्धा सुरु आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जगभरातून खेळाडू भारतात आले आहेत. मात्र येथील करोना परिस्थिती बिकट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेत मायदेशी गाठला आहे. तर काही खेळाडू अद्यापही IPL मध्ये खेळताना दिसतायेत. अशातच आज भारतात IPL खेळण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंबाबत तेथील पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
भारतातील वाढत्या करोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने भारतातून होणारी हवाई वाहतूक १५ मे पर्यंत तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे, आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी मायदेशात परतण्यासाठी व्यवस्था त्यांनी स्वत:च करावी, अशी स्पष्ट भूमिका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचे अनेक क्रिकेटपटू, समालोचक आणि प्रशिक्षकांनी IPL स्पर्धेसाठी भारतात हजेरी लावली आहे. मात्र आता येथील रुग्णसंख्या वाढू लागल्याने भारतातून मायदेशात परतण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारनं व्यवस्था करावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडून करण्यात आली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ही मागणी थेट फेटाळून लावली आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू अँड्रयू टाय, केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांनी भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर आयपीएलमध्ये अजूनही ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू खेळत आहेत. यात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅच कमिन्स यांच्यासह प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सायमन कॅटिच यांचा समावेश आहे. याशिवाय समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकेल सॉल्टर आणि लिसा स्थेलकर देखील आयपीएलमध्ये समालोचन पथकाचे सदस्य आहेत.





