पंतप्रधान मोदींचा राष्ट्राध्यक्ष पुतीनला फोन, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

नवी दिल्ली – युक्रेनने पूर्व युक्रेनमध्ये पाच रशियन विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार युक्रेनवर हे हल्ले करण्यात आले. युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात 40 हून अधिक युक्रेनियन सैनिक आणि 10 नागरिक ठार झाले आहेत.
तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात सावध भूमिका घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनीटांची चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मोदींनी पुतीन यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
तसेच त्यांनी युक्रेनसोबतचा तणाव संवादानं सोडवण्याचं आवाहन केलं. युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्द्यावरही पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन सर्व घडामोडींबद्दल गुरुवारी रात्री उशीरा चर्चा झाल्याची माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलीय.
पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनसंदर्भातील ताज्या घडामोडींची माहिती दिली. त्याचवेळी रशिया आणि नाटो गटांमधील मतभेद प्रामाणिक संवादातूनच सोडवले जाऊ शकतात, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला. हिंसाचार ताबडतोब थांबवण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदींनी सर्व पक्षांना राजनैतिक संवाद आणि संवादाच्या मार्गावर परतण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.





